Home अपरिचित इतिहास डार्विनला हवी होती नगरची माणसं !

डार्विनला हवी होती नगरची माणसं !

by sinhasan

इतिहासाची पाने चाळताना कधीकधी असे अनपेक्षित धागे हाती लागतात, जे आपल्या गावाचा संबंध थेट जगाच्या मोठ्या वैज्ञानिक घटनांशी जोडून देतात. असाच एक अभिमानास्पद धागा अहमदनगरला (आताचे अहिल्यानगर) महान शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांच्याशी जोडतो. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी, इंग्लंडमधील आपल्या प्रयोगशाळेत बसलेल्या डार्विनला एका महत्त्वाच्या संशोधनासाठी नगरच्या माणसांची गरज भासली होती.

१८५९ साली ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज’ हा ग्रंथ लिहून डार्विनने जीवशास्त्रात क्रांती घडवली. त्यानंतर त्याला मानव आणि प्राण्यांच्या भावभावनांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करायचा होता. जगातील वेगवेगळ्या भागांत राहणारे लोक राग, आनंद, दुःख, आश्चर्य, भीती आणि लाज या भावना एकसारख्याच व्यक्त करतात का, हे त्याला वैज्ञानिकदृष्ट्या तपासायचे होते.

यासाठी १८६७ साली त्याने सोळा प्रश्नांची प्रश्नावली तयार केली. आश्चर्य वाटल्यावर भुवया उंचावतात का? लाज वाटल्यावर गाल लाल होतात का? संताप आल्यावर मुठी आवळल्या जातात का? असे बारकाईने विचारलेले प्रश्न होते. महत्त्वाची अट होती – केवळ स्मरणशक्तीवर अवलंबून न राहता, प्रत्यक्ष निरीक्षण करून उत्तरे पाठवावीत. ही प्रश्नावली त्याने जगभरातील मित्र, मिशनरी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना पाठवली. त्या यादीत तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीतील अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर एच. एन. बी. एरस्काइन यांचे नाव होते.

एरस्काइन यांनी प्रश्नावली हाती घेतली आणि नगरच्या लोकांचे निरीक्षण सुरू केले. पण येथे एक मोठी अडचण आली. युरोपियन अधिकाऱ्यांसमोर स्थानिक लोक भावना सहज व्यक्त करत नसत. साहेबांसमोर शांत आणि संयमी राहण्याची सवय असल्याने चेहऱ्यावरील भाव टिपणे कठीण झाले. एरस्काइन यांनी कॅनरा येथील न्यायाधीश मिस्टर वेस्ट आणि काही स्थानिक गृहस्थांची मदत घेतली. स्वतःच्या निरीक्षणातून त्यांनी डार्विनला एक महत्त्वाची नोंद पाठवली – “येथील हिंदू लोक दुःख झाल्यावर भावना रोखून धरण्याचा प्रयत्न करतात; पण जेव्हा रडू आवरत नाही, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून युरोपीय लोकांप्रमाणेच अश्रू ढाळतात.”

अहमदनगरमध्ये पूर्ण यश मिळाले नाही, ते कलकत्त्यातील बोटॅनिक गार्डनचे क्युरेटर जॉन स्कॉट यांनी साधले. त्यांनी विविध स्थानिक आणि आदिवासी लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण करून सविस्तर उत्तरे पाठवली. जगभरातून आलेल्या या माहितीच्या आधारे डार्विनने १८७२ साली ‘द एक्सप्रेशन ऑफ द इमोशन्स इन मॅन अँड अ‍ॅनिमल्स’ हा ग्रंथ प्रकाशित केला.

या पुस्तकात डार्विनने दाखवले की जगातील सर्व माणसांच्या चेहऱ्यावरील भावना आणि स्नायूंची रचना सारखीच आहे. त्यामुळे रंग, वंश किंवा भूगोल वेगळा असला तरी मानवजात एकाच मुळापासून उत्क्रांत झाली आहे

आज जेव्हा आपण त्या पुस्तकाची पाने उघडतो आणि ‘अहमदनगर’ हे नाव वाचतो, तेव्हा अभिमान वाटतो. विज्ञानाच्या इतिहासात आपल्या नगरचे नाव कायमस्वरूपी नोंदले गेले आहे. इंग्लंडमधील प्रयोगशाळेत बसलेल्या डार्विनला मानवजातीचे रहस्य उलगडण्यासाठी कधीकाळी नगरच्या माणसांची गरज भासली होती – ही कल्पनाच सुखावणारी आणि अभिमानास्पद आहे.

श्री.सतीश भीमराव सोनवणे
इतिहास अभ्यासक
मो : 77096 83323
अहिल्यानगर

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल

Leave a Comment

error: कॉपी नका करू. लिंक शेअर करा.