Home अपरिचित इतिहास अफझलखान वधानंतर शिवरायांची वाळव्याला भेट

अफझलखान वधानंतर शिवरायांची वाळव्याला भेट

ऐतिहासिक भेटीला ३६३ वर्षे पूर्ण

by sinhasan

छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगली जिल्ह्यातील वाळवे गावाला १७ डिसेंबर १६५९ रोजी भेट दिली होती. शिवरायांच्या या ऐतिहासिक भेटीला ३६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. वाळवे येथील इतिहासप्रसिध्द उमराणी घराण्यात मिळालेल्या एका ऐतिहासिक टिपणात अफझलखान वधानंतर घडलेल्या घटना देताना शिवाजी महाराज हे पौष शुध्द १४ शके १५८१, शनिवारी वाळव्यात आल्याची नोंद केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सांगली जिल्ह्याशी घनिष्ठ संबंध होते. जिल्ह्यातील भुपाळगड, मच्छींद्रगड आणि प्रचितगड हे तीन किल्ले शिवरायांच्या ताब्यात होते. मिरजेच्या किल्ल्याला शिवरायांनी घातलेला वेढा हा इतिहासप्रसिध्द आहे. सध्याच्या सांगली जिह्यातील बहुतांशी भाग हा आदिलशहाकडे होता. तो ताब्यात घेण्यासाठी शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी वारंवार प्रयत्न केल्याचे आढळून येते. छत्रपती शिवरायांची रत्नजडीत लेखणी मिरजेत जतन करून ठेवण्यात आली होती. शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे पुत्र शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज अशा चार पिढ्यांचे सांगली जिल्ह्याशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी संबंध आले होते.

शिवरायांची मिरज स्वारी

या तीन किल्ल्याबरोबरच मिरज येथील प्रसिध्द असा भुईकोट किल्ला जिंकण्यासाठी शिवरायांनी केलेली स्वारी ही इतिहास प्रसिध्द आहे. हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे इ.स. १६६० मध्ये मिरजेत आले होते. १६५९ च्या नोव्हेंबर महिन्यात अफजखानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराज आणि नेताजी पालकरांच्या फौजा विजापूरची अदिलशाही पादाक्रांत करण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांनी वाईपासून दक्षिण महाराष्ट्रातील अनेक गावे जिंकून घेतली. शिवचरित्राचे अस्सल साधन मानले गेलेल्या ‘शिवभारता’ मध्ये या गावांची नावे दिली आहेत. यामध्ये सध्याच्या कराड, वाळवा, तासगांव आणि मिरज तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे.

शिवभारतात वाळवा घेतल्याची नोंद

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजखान वधानंतर दक्षिण महाराष्ट्रील गावे जिंकून घेण्यासाठी या भागात स्वाऱ्या केल्या. ‘शिवभारत’ मध्ये या भागातील २३ गावांची नोंद आहे. यामध्ये खटाव, मायणी, रामापूर, कलेढोण, वाळवे, अष्टे, नेरले, कामेरी, विसापूर, उरण, कोळे यांसह अन्य गावांचा उल्लेख आहे. शिवभारतात नोंदविलेल्या या घटनांना पुष्टी देणारे एक ऐतिहासिक टिपण वाळवे येथील विष्णू उमराणी यांच्या घराण्यातील कागदपत्रांत मिळाले होते. सन १९२६ साली भारत इतिहास संशोधन मंडळाच्या एका त्रैमासिकात ते प्रसिध्द करण्यात आले.

वाळव्यातील ऐतिहासिक टिपण

वाळवा येथील उमराणी घराण्यातील ऐतिहासिक टिपण हे अफजखान वधानंतर शिवरायांनी केलेल्या हालचालींची माहिती देणारे अस्सल टिपण आहे. उमराणी घराणे हे ऐतिहासिक घराणे असून त्यांच्याकडे वाळवे येथील ग्रामोपाध्येपणाचे वतन होते. या घराण्यात अदिलशाही काळापासूनची शेकडो कागदपत्रे होती. या घराण्यात अनेक सनदा, महजर, ऐतिहासिक पत्र्यव्यहार, ज्योतिषविषयक हस्तलिखीते, जुन्या कुंडल्या, टिपणे अशी कागदपत्रे असल्याची नोंद भिलवडीचे सुपुत्र आणि भारत इतिहास संशोधन मंडळाचे संशोधक मिया शिकंदरलाल आत्तार यांनी करून ठेवली आहे. याच ऐतिहासिक उमराणी घराण्यात एक टिपण मिळाले. बाळबोध लिपीत हे टिपण असून त्यामध्ये अफझलखानाची स्वारी आणि त्याचा वध झाल्यानंतर कोणत्या घटना घडल्या, याची माहिती मिळते. अफझलखानाच्या स्वारीमुळे तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर येथील मूर्ती काढल्या होत्या. त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यास मारले आणि पन्हाळा घेतला. अशा प्रमुख नोंदी केल्या आहेत. अफजखान वधानंतरच्या शिवरायांच्या हालचाली अभ्यासण्यासाठी वाळव्यातील हे टिपण अत्यंत उपयुक्त आहे.

वाळव्यात शिवरायांचा मुक्काम

उमराणी घराण्यात मिळालेल्या या ऐतिहासिक टिपणात शिवराय वाळव्यात आल्याची नोंद आहे. शिवरायांनी अफजखानानास मारल्यानंतर मार्गशीर्ष वद्य ७ रोजी पन्हाळा किल्ला घेतला. त्यानंतर ‘शाजिचा लेके पातशाय अस्ता सिंहस्त बृहस्पति आला होता पुष्य शुध चतुर्दशी १४ शनिवारी वाळव्यास शिवाजी भोसला’ असा उल्लेख आहे. म्हणजेच शिवाजी महाराज हे १७ डिसेंबर १६५९ रोजी वाळवे गावी आले होते, याचा हा अस्सल पुरावा आहे.

आजवर छत्रपती शिवाजी महाराज हे सांगली जिल्ह्यातील मिरज येथेच आल्याचे मानले जात होते. मात्र, वाळव्यातील या टिपणावरून ते वाळवा गावीही आले होते, हे स्पष्ट होते. वाळवा गावाच्या दृष्टीने ही ऐतिहासिक घटना आहे.

 

वाळव्याला ऐतिहासिक वारसा

वाळवा गावाला एक हजारहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. प्राचीन व्यापारी मार्गावरचे हे गाव आहे. या गावात जुन्या इतिहासाच्या पाऊलखुणा मोठ्या प्रमाणात सापडतात. वाळव्याला भुईकोट होता. या कोटाच्या दुरूस्तीचे काम सन १७५२ मध्ये सुरू असल्याची नोंद आहे. या गावात ढाल, तलवार, वाघनखे, तोफांचे गोळे, लहान तोफा यांसारखी ऐतिहासिक शस्त्रे मिळाली होती. बहामनी, अदिलशाही आणि मुघलकालीन नाणीही या गावात मिळाली आहेत.

इतिहास अभ्यासक व संशोधक
मानसिंगराव कुमठेकर
मिरज
9405066065

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल

Leave a Comment

error: कॉपी नका करू. लिंक शेअर करा.
%d bloggers like this: