चैत्र पाडवा हा अनेक अर्थानी भारतीय द्वीपकल्पात महत्वाचा सण आहे. खगोलीय स्थिती, हवामान याचा अभ्यास यात आहे.
शालिवाहन शके सुरुवात करणारी सातवाहन राजवट आणि राजे पैठण ( प्रतिष्ठान नगर ) नगरीतून दक्षिण तटावर राज्य करत होते. महाराष्ट्री प्राकृत भाषेला राज भाषेची मान्यता देणारे शालीवाहन , इस पू २ ते इस २ या काळात अर्ध्या जगावर व्यापारात आपली मांड राखून होते …. समस्त मराठी माणूस ज्या चैत्र पाडव्याला आपले नवीन वर्ष मानतो , त्याची सुरुवात याच सातवाहनांनी केली. त्याचाही एक खुप रंजक इतिहास आहे.
सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी ( कर्तबगार महिलांच्या नावाने पुत्र ओळखले जायचे ) हा प्रचंड पराक्रमी राजा होवून गेला. त्याने पहिल्या शतकात आपल्या राजवटीत अनेक सुधारणा केल्या आणि याच काळात त्यांनी गोदावरीच्या तटाच्या जवळ म्हणजे नाशिक जवळ ( गोवर्धन येथे ) शक, क्षेत्रप यांचा पराभव केला. तो दिवस म्हणजे पहिल्या शतकातले 78 च्या चैत्र महिन्याचा पहिला दिवस …त्या दिवशी महाराष्ट्राच्या भूमीत परकीय शकांचा पराभव सातवाहनांनी केला म्हणून हा उत्सव साजरा केला. त्या दिवसापासून या विजयाच्या प्रित्यर्थ गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शालीवाहन शके सुरु केले.
पुढे गुजरात मधील शक राजवटीनेही हिच दिनदर्शिका स्विकारली अशा प्रकारे मध्य भारतात चैत्र पाडव्या पासून वर्षाची सुरुवात झाली. त्यामुळे सातवाहन ( शालिवाहन ) राजा गौतमीपुत्र सातकर्णी हा शककर्ता आहे . गौतमीपुत्र सातकर्णीची पत्नी नागनिका हिने सातकर्णीच्या पश्चात त्याचे राज्य मोठ्या हिमतीने चालविले नव्हे स्वतःची कर्तबगारीही सिध्द केली. कल्याण बंदराला ( प्राचीन व्यापारी बंदर ) आणि दख्खनच्या पठाराला व्यापारी मार्गानी जोडणारा नाणे घाट बांधून जागतिक व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना दिली. सातवाहन राजांनी महाराष्ट्र साहित्यात, व्यापारात आणि सांस्कृतिक दृष्ट्या बलवान करण्याचा प्रयत्न केला. आंधप्रदेशची आताची राजधानी अमरावती येथे सातवाहन काळाच्या अनेक पाऊलखुणा जतन करून ठेवल्या आहेत.
इंग्रजी कॅलेंडर मधून 78 वजा केल्यानंतर सातवाहन शके जुळतं…. आज आहे 2022 – 78 = 1944 म्हणजे आज आहे चैत्र शके 1944
युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर