अश्मयुगातील मानवाने तयार केलेली गुहाचित्रे उभ्या दगडांवर / भिंतींवर असतात. तर आडव्या भूपृष्ठावर असणाऱ्या चित्रांना / आकृत्यांना ‘जिओगलिप्स’ असे म्हणतात. महाराष्ट्रात कोकणातील कातळशिल्पे आपले वेगळे अस्तित्व दाखवतात. अश्मयुगातील किंवा प्रागैतिहासिक काळातील मानवाने या आकृत्या नक्की कोणत्या कालखंडात कोरल्या असाव्यात याची निश्चिती नाही.
आत्तापर्यंत रत्नागिरी तालुक्यात ४९० पेक्षा जास्त , राजापूरमध्ये २९० पेक्षा जास्त ; तर लांजा येथे ७० पेक्षा जास्त इतक्या संख्येने खोदचित्रे नोंदविण्यात आली आहेत.
कोकणातील या कातळ- खडकातील चित्रांमध्ये अनाकलनीय रचना, मानवाकृती, पक्षी, समुद्री जीव, नागमोडी सर्प, इत्यादी प्रकारचे आकृती दिसतात. त्या आकारानेही प्रचंड मोठ्या आहेत. कोकणात आढळणारी प्रत्येक ठिकाणची शिल्पे वेगवेगळी आहेत. यापूर्वी जगामध्ये इतर ठिकाणी आढळलेली शिल्पे तुलनात्मक दृष्ट्या मऊ प्रकारच्या दगडात कोरलेली आहेत. पण, कोकणातील शिल्पे कोरलेला जांभा दगड त्यामानाने कठीण आहे. हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच प्रदीर्घ कालावधीत त्यावर ऊन-पाऊस, थंडी-वारा अशा वातावरणीय बदलांचा परिणाम होऊनही ती अस्तित्व टिकवून आहेत. कातळशिल्पातील मानवाकृतीला ‘गावराखा’ किंवा ‘पाच पांडव’ सुद्धा म्हणतात.
कशेळी : इथले शिल्प भारतातील सर्वात मोठे कातळशिल्प असावे. इथल्या हत्तीची आकृती १८ मीटर x १३ मीटर इतकी भव्य आहे. हत्तीच्या आकृतिबंधाच्या पोटात वाघ, माकड, शार्क, गेंडा, स्टिंग रे, पक्षी, मोर यांसारख्या ७०/८० प्राणी व पक्षी आकृत्या आहेत.
देवीहसोळ : येथील आर्यदुर्गा मंदिराजवळ कातळशिल्पे आहेत. शिल्पाचा आकार ८.५० मीटर x ८.५० मीटर आहे. इथले चित्र खरंच अनाकलनीय आहे. आयतामध्ये वेगवेगळ्या भौमितीय रचना असून त्यात कुठेही प्राणी अथवा पक्षी दिसून येत नाही. या चित्राचा चर ८ ते १० सेमी आहे.
उक्षी : हत्तीचे कातळशिल्प आहे. अतिशय देखण्या हत्तीचे सुळे, कान, शेपूट, सोंड व पाय हे सर्व अवयव सुबकपणे चितारलेले आहेत.
बारसू : इथे दोन वाघांच्यामध्ये माणूस उभा असल्याची रचना मानवाच्या खऱ्या आकारापेक्षा मोठ्या प्रमाणावर कोरलेली आहे माणसाच्या शेजारी मासा, ससा आणि मोरसुद्धा आहेत.
देवूद : येथील चित्रात एकशिंगी गेंडा, हरिणाच्या कुळातील प्राणी, काही अनाकलनीय प्राणी आणि भौमितीय रचना आहेत. गेंड्याचे कान आणि शिंग उठून दिसते. प्राण्यांचे आकार माकड आणि कोह्यासारखे दिसतात.
जांभरूण : या ठिकाणी ५० आकृत्या कोरलेल्या आहेत. त्यापैकी ८ मानवाच्या तर इतर जलचर प्राणी आणि चार पायांच्या प्राण्यांचे आकार आहेत.

बारसू सडा

देवाचे गोठणे येथील कातळशिल्प
अतुल मुळीक.
इतिहास अभ्यासक,
सांगली.
1 comment
nice blog