प्राचीन अहिरदेश म्हणजेच सध्याच्या खान्देश प्रांतातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असणारं दिघी हे लहानसं गावं. पाचोरा या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण ४० कि.मी. तर चाळीसगाव पासून २३ कि.मी. अंतरावर हे गावं आहे. गाव जरी लहान असलं तरी गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावात प्राचीन यादवकालीन मंदिर असुन सध्या मंदिरात स्थानिकांनी देवी महिषासुरमर्दिनीची स्थापना केलेली आहे.
अग्निजन्य खडकामध्ये बांधलेले हे देवीचे मंदिर स्थापत्य शैलीनुसार १३ व्या शतकातील आहे. साधारण या काळातील मंदिरे ही हेमाडपंथी मंदिरे म्हणून ओळखली जातात. मंदिर एका उंच अधिष्ठानावर उभे असून या पूर्वाभिमुख मंदिराची रचना अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मंदिराचे मूळ छत आजमितीस अस्तित्वात नाही. मंदिराच्या गर्भगृहावर शंकूच्या आकाराचे छत नंतरच्या काळात बांधले गेले आहे. ज्यावर कांस्य कलशांची योजना करण्यात आली असून सभामंडपाला पुन्हा शंकूच्या आकाराचे छत आहे.
मंदिराचा बाहेरचा भाग अगदी साधा असून केवळ अर्धमंडपाच्या बाहेरील भागावर काही शिल्पाकने आपल्या नजरेस पडतात. यात देवी चामुंडा व भैरव शिल्पं आहे. अर्धमंडपाचे स्तंभ देखील सुरेख शिल्पांनी सजवलेले आहेत.स्तंभावर भारवाहक यक्षांची योजना केलेली आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचा सभामंडप स्तंभ विरहित आहे. या मंदिराचा सर्वात देखणा भाग म्हणजे सभामंडपाचे छत!
कमनीय स्त्री शिल्पांनी व पोट सुटलेल्या भारवाहक यक्षांनी तोलून धरलेले मंदिराचे छत केवळ अप्रतिम आहे. सभामंडपात श्री भगवान विष्णूची एक भग्न परंतु सुबक अशी मूर्ती आपल्या नजरेस पडते.
गर्भगृहाची द्वारशाखा सुंदर अश्या कोरीव कामाने सजलेली आहे. गर्भगृहात अठराभुजा महिषासुरमर्दिनीची प्रतिमा आहे.
मंदिराचे महत्त्व लक्षात घेऊन पुरातत्व विभागाने ही वास्तू राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे. खान्देश भेटीत चुकवू नये असे हे ठिकाण आहे.
रोहन गाडेकर
इतिहास व मंदिर अभ्यासक