Home इतिहासाच्या पाऊलखुणा काठापूरमधील वाघ वाडा

काठापूरमधील वाघ वाडा

होळकर राजघराण्याशी घनिष्ठ संबंध

by sinhasan

सन १७५० च्या दरम्यान या वाड्याचे निर्माण सुभेदार मल्हारराव होळकर पहिले यांच्या राज्यकाळात झाले. ज्यावेळेस सुभेदार मल्हारराव होळकर यांना सातारच्या छत्रपतीं कडून पेशव्यांच्या मार्फत जुन्नर प्रांतातील वाफगावची जहागिरी मिळाली, तेव्हा सुभेदारांनी या भागात एकाच वेळीस ६ ठिकाणी ६ किल्ले सदृश्य वाड्यांचे बांधकाम सुरु केले होते. त्यातीलच एक काठापूरचा होळकर वाडा किंवा वाघ वाडा व उर्वरित ५ वाडे म्हणजे खडकी-पिंपळगाव ता.आंबेगाव, वाफगाव ता.खेड, अवसरी व मंचर ता.आंबेगाव व काठापूर खुर्द.ता.शिरुर

सन १७६१ ला पानिपतच्या युद्धात हिंदवी स्वराज्यासाठी अनेक सरदार धारातीर्थ पडले. त्यामध्ये होळकरशाहीचे सरदार संताजी वासुजी वाघ हि होते सरदार संताजी वाघ हे वाघ घराण्याचे जेष्ठ पुरुष होय.. सरदार संताजी वाघ यांचा प्रथम उल्लेख हा सन १७६१ च्या दरम्यानच भेटतो. पुढे सन १७६५ ला होळकर राजघराण्याकडून सरदार संताजी वाघ यांच्या वंशजांना मध्यप्रदेशातील महिंदपूर परगणा व अन्य काही गावे आणि महाराष्ट्रातील काठापूर (बुद्रुक), काठापूर (खुर्द), अवसरी (बुद्रुक) या गावांची जहागिरी देण्यात आली.

वाफगाव होळकरांकडे तर पिंपळगाव खडकिचा वाडा मल्हाररावांची कन्या उदाबाई वाघमारे यांना देण्यात आला, तेव्हा पासून हा काठापूरचा वाडा “वाघ वाडा” झाला. तर खडकिचा वाघमारे वाडा झाला तसेच संताजी वाघ यांची कन्या प्रिताबाई हिचा विवाह सुभेदार मालेराव होळकर यांच्याशी लावून देण्यात आला होता. सुभेदार मालेराव होळकर हे अहिल्यादेवींचे पुत्र व सुभेदार मल्हारराव होळकर यांचे नातू होय! महिंदपूर परगणा हा होळकरशाहीतील सर्वात मोठा परगणा होता, त्याचे उत्पन्न हि सर्वात जास्त होते आणि वाघ घराण्याने या परगण्याची जहागिरी एकदम चोख संभाळली होती म्हणून तेथील स्थानिक लोक त्यांना “वाघ राजा” संबोधत असत ते आजपर्यत पुढे तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धातील दुसरी लढाई म्हणजेच होळकर-इंग्रज लढाई हि सन २६ नोव्हेंबर १८१७ ला महिंदपुर येथे च झाली होती, त्यांनतर होळकर-इंग्रज यांच्यातील मंदसोर तहानुसार महिंदपुरची हि जहागिरी सन १८१८ ला पुन्हा होळकर राजघराण्याच्या ताब्यात आली. त्यानंतर सन १८३४ ला महाराजा हरिराव होळकर (१८३४-१८४३) यांनी पुन्हा वाघ घराण्याला महिंदपुरची जहागिरी कायमची बहाल केली. सन १८१७ च्या होळकर-इंग्रज लढाईत महाराजा हरिराव होळकर हे सरदाराच्या भूमिकेत एका तुकडीचे नेतृत्व करत होते. त्या लढाईत त्यांचा घोडा मारला गेला होता त्याची समाधी आजही महिंदपुर येथे आहे.. काठापूर (बु), ता.आंबेगाव हे गाव घोडनदीच्या उजव्या काठावर वसलेले आहे व नदीच्या पलीकडे डाव्या बाजूला दुसरे काठापूर आहे, ते काठापूर (खुर्द) असून शिरूर तालुक्यात येते. या दोन्ही ठिकाणी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपल्या राज्यकाळात (१७२८-१७६६) वाडे बांधून काढले होते.

या वाड्यांना एका भुयारी मार्गाने जोडले होते. भुयारी मार्ग नदीच्या पात्राखालून जात होता, असे सांगितले जाते. एकेकाळी हे दोन्ही वाडे होळकरांच्या मालकीचे होते, त्यापैकी काठापूर (खुर्द), ता.शिरूर येथील वाडा पूर्णपणे जमीन दोस्त झाला असून काठापूर (बुद्रुक) येथील वाडा खाजगी मालकीत होता पण सहा महिन्यापुर्वी पुन्हा तो सरकारी मालकीत आला आहे ग्रामपंचायत दप्तरी महाराष्ट्र शासन अशी नोंद सध्या झाली आहे सध्या एक वेस नजरेस पडते… राज वाड्याच्या प्रवेशद्वार बघितल्यावरच या वाड्याचे वैभव लक्षात येते. गावकरी या वाड्याला वाघाचावाडा म्हणतात.

सध्या अस्तित्वात असलेली वेस व वाड्याच्या बांधकामाचा नमुना एकूणच १८ व्या शतकातील असून त्यामध्ये मराठा रजपूत कलाकसूर दिसून येते वाड्याचे बांधकाम हे विटा, चुना मिश्रित आहे.त्या काळातील वास्तुरचनेतील भक्कमपणा, स्थापतींचे कौशल्य, कामगारांचा प्रामाणिकपणा, सुतारांचा लाकूड कामातील बारकावेचे दर्शन होते मागचे दोन बुरुजांची पडझड झाली असून जमिनीपासून पंधरा फूटांपर्यंत दगडी बांधकाम तर त्यावरील पंचवीस फूटांचे बांधकाम उत्तम प्रकारच्या विटांचे चुन्यातील असे आहे. वाड्याचे प्रवेशद्वार पूर्ण घडीव दगडांचे असून भक्कम आहे. त्यावरील तीनमजली सज्जा अजून सुस्थितीत पाहायला मिळतो. बुरुजांवरील पाकळ्या त्याची शोभा वाढवतात. दरवाजावरील दोन लांबट पट्ट्यांवर व सज्जाच्या प्रत्येक गवाक्षावर उत्कृष्ट असे रेखीव नक्षी काम आहे. आतील भाग पूर्णपणे ढासळलेला आहे. सध्या स्थितीला फक्त काही भुयारे, तळघर यांचे अवशेष नजरेत पडतात, वाड्याच्या आत जुन्या इमारतींचे सर्वत्र पडलेले अवशेष आहे. दोन भुयारे मात्र अस्तित्व दाखवून जातात. हा राजवाडा तीन मजली असावा असे दिसून येते.

मुख्य सदरेच्या खाली एकूण चार ते पाच तळघरे असावित, वाड्याची तटबंदी ढासल्यामुळे तसेच झाडा-झुडपांमुळे, तळघराचे प्रवेशद्वार बंद झाले आहेत. वाड्याच्या मुख्य सदरेच्या माघील बाजूस एक जुनं वीट बांधकाम केलेला पाण्याचा आड (विहीर) आढळते. वाड्याच्या डाव्या बाजूस तटबंदीला लागून नदीपात्रात एक विहीर आहे, तसेच तटबंदीचे दर्शनी बुरुंज सुस्थितीत आहे, तर बाजूची तटबंदी ढासळली आहे.

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल

Leave a Comment

error: कॉपी नका करू. लिंक शेअर करा.
%d bloggers like this: