Home इतिहासाच्या पाऊलखुणा मराठी भाषेतील सर्वात जुना शिलालेख !

मराठी भाषेतील सर्वात जुना शिलालेख !

शिलालेख शके ९३४ म्हणजे इ.स. १०१२ चा

by sinhasan

श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मुर्तीजवळील इ.स. १०१७ चा मराठी शिलालेख प्रसिद्ध आहे, पण आक्षी येथील मराठी शिलालेखाचा काळ त्यापूर्वी जातो. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी केलेल्या संशोधनानुसार तो मराठीतील आजपर्यंत सापडलेला सर्वात जुना शिलालेख आहे. या शिलालेखाबाबत त्यांनी त्यांच्या ‘प्राचीन मराठी कोरीव लेख’ व ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ या दोन्ही पुस्तकात लिहिले आहे.

रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ आक्षी हे गाव आहे. या गावात २ शिलालेख आढळून आले, त्यांचे वाचन हे डॉ. शं. गो. तुळपुळे या प्रसिद्ध पुरातत्वविदाने केले होते. हा शिलालेख शके ९३४ म्हणजे इ.स. १०१२ चा असून आजपर्यंतचा सर्वात जुना मराठी शिलालेख ठरतो.

हा शिलालेख खरतर गधेगळीवर आहे. (एखाद्या मंदिरास कुणी इनाम अथवा दान दिल्यास त्याचा गैरवापर होऊ नये अथवा त्याचा भंग होऊ नये यासाठी एक प्रकारे शाप देण्याच्या हेतूने ‘गधेगळ’ उभारली जात होती.
गधेगळीवर गाढव स्त्रीशी समागम करताना दाखवले जाते, आणि शिलालेखात ती शापवाणीदेखील अत्यंत स्पष्टपणे लिहिली जाते. )

हा शिलालेख शिलाहारकालीन असून यात संवत सह वार देखील उल्लेखित आहे. नऊ ओळींचा हा शिलालेख संस्कृतमिश्रित मराठी भाषेत असून देवनागरी लिपीत आहे. या शिलालेखाच्या वर सूर्य- चंद्राचे अंकन आहे. आधी शिलालेख आणि मग अर्थ बघूया:

गीं सुष संतु। स्वस्ति ओं। पसीमस
मुद्राधीपती।स्त्री कोंकणा चक्री
वर्ती। स्त्री केसीदेवराय।महाप्रधा
न भइर्जु सेणुई तसीमीनी काले
प्रव्रतमने।सकु संवतु: 934 प्रधा
वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ
लु।भइर्जुवे तथा बोडणा तथा नऊ
कुवली अधोर्यु प्रधानु। महलषु
मीची वआण। लुनया कचली ज

अशा नऊ ओळींचा हा शिलालेख असून, शेवटच्या ओळीतील ‘ज’ हा शेवटचा शब्द नसून पहिल्या ओळीतील ‘गीं सुष संतु।’, पूर्ण ‘जगीं सुष संतु।’ म्हणजे ‘जगी सुख नांदो’ असा या शिलालेखाचा शेवट आहे. खाली जागा न पुरल्यामुळे ती वर मोकळ्या जागेत कोरली आहे. बाकी ओळींचा अर्थ असा कि,

”कल्याण होवो. पश्चिम समुद्राधिपती श्री. कोकण चक्रवर्ती श्री. केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत ९३४ प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. जगी सुख नांदो.”

या शिलालेखाच्या खाली शापवाणी म्हणजे गाढव स्त्रीशी समागम करतानाचे अंकन आहे. ‘हे शासन कुणी भंग करील त्याची माय गाढवे झबिजे’ असा त्याचा अर्थ आहे. हा मराठीतील पहिला शिलालेख असून मराठीच्या वाङ्मयीन इतिहास त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. श्री. तुळपुळे यांनी बघितले तेव्हा हा शिलालेख गटारात पडलेला होता, इ.स. १९९५ ला जेव्हा त्यांनी त्यावर लेख लिहिला तेव्हा तो एका चौथऱ्यावर उभा करण्यात आला.
आक्षी गावात आज तेथील दोन्ही शिलालेखांना चौथऱ्यावर ठेऊन त्याला छप्पर देखील करण्यात आलय. आपल्या प्रत्येक सांस्कृतिक वारशाचं असच जतन आणि संवर्धन होणं गरजेचं आहे.

 

श्री आशुतोष पाटील.
ऐतिहासिक नाणी संग्राहक, अभ्यासक, संशोधक व लेखक
औरंगाबाद
#HiStoryteller

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल

Leave a Comment

error: कॉपी नका करू. लिंक शेअर करा.
%d bloggers like this: