Home इतिहासाच्या पाऊलखुणा वीरगळ म्हणजे इतिहासाचे मूक साक्षीदार

वीरगळ म्हणजे इतिहासाचे मूक साक्षीदार

by sinhasan

गावागावांत युद्धप्रसंग कोरलेले तीन- साडेतीन फूट उंचीचे दगड अनेकदा आपल्याला दिसतात. हे दगड म्हणजे नेमके काय आहे, कशासाठी हे दगड उभारले आणि कोणत्या कालखंडात उभारले गेले याची माहिती गावातील गावकऱ्यांनाही नसते. अनेकदा कोरलेल्या शिळा असल्याने गावातील मंदिराच्या परिसरात या आणून ठेवल्या जातात. या शिळा म्हणजे वीरगळ.

वीरगळ म्हणजे कोणत्याही लढाईत किंवा युद्धभूमीवर वीरमरण प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ उभारलेला वैशिष्ट्यपूर्ण दगड.

पूर्वज किंवा मृत योद्धा यांच्या स्मृतीशिळा उभारण्याची पद्धत भारतात सगळीकडे आढळून येते. गाईचे रक्षण करताना मरण पावलेलेल्या योध्दांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकशिळांना पश्चिम भारतामध्ये “गोवर्धन” या नावाने, तर पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या स्मारकशिळांना “पालिया” या नावाने संबोधतात. महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये अशा स्मारकशिळांना वीरगळ अथवा कांदळ म्हटले जाते. ‘वीर-कल’ ह्या कन्नड शब्दावरून ‘वीरगळ’ हा शब्द आलेला आहे. वीरगळांचा उगम कर्नाटकात झाल्याचे दिसते. तेथून त्यांचा महाराष्ट्रात प्रसार झाला.

कोळे (ता.कराड. जि.सातारा) येथील वीरगळ.

वीरगळ कशी वाचावी –

वीरगळ शिळेवरील प्रसंग अनुक्रमे साधारणपणे तीन किंव चार चौकोनात विभागलेला असतो. तळाच्या चौकोनात वीरांचे युद्ध व त्याचा मृत्यू, मधील चौकटीत त्याचे स्वर्गारोहण व वरील चौकटीमध्ये वीर स्वर्गात करीत असलेली देवपूजा याप्रमाणे शिल्पे कोरलेली असतात.

– वीरगळावर सगळ्यात खालच्या चौकटीत जेथे तो वीर धारातीर्थी पडला, तेथील युध्दप्रसंग कोरलेला असतो. युध्दप्रसंगांत बरेच वैविध्य असते. उदा., ढाल-तलवारींनी समोरासमोर लढणारे सैनिक, घोडेस्वारांची लढाई, गाईच्या चोरीवरून लढाई झाली असल्यास गाईंचा कळप एका बाजूला असतो. नाविक युध्द असल्यास अनेक वल्ह्यांच्या नावा दिसतात.

– खालून दुसऱ्या चौकटीत, वीरगती पावलेल्या माणसाला अप्सरा कैलासाला नेत आहेत, असे चित्र कोरलेले असते. हा प्रवास कधी पालखीतून, तर कधी रथातून होताना दिसतो.

– सगळ्यांत वरच्या चौकटीत कैलासामध्ये शिवाच्या पिंडीची पूजा करताना तो वीर दाखविलेला असतो. वीरगळाच्या सर्वांत वरच्या बाजूला देवळाच्या कळसासारखा भाग दिसतो व त्याच्या दोन्ही बाजूंस चंद्र-सूर्य कोरलेले असतात. जोपर्यंत चंद्र-सूर्य उगवत आहेत, तोवर ह्या वीराची कीर्ती कायम राहील, हे ह्यातून सांगायचे असते. वीरगळावर कधीकधी चार वा पाच चौकटीही असतात. वीरगळांचा काळ अंदाजे ११ ते १३ शतक असा आहे.

मुंबई महानगराच्या बोरिवली या उपनगरातील एक्सर गावठाणातील दोन वीरगळांवर नौदल युद्धाचे चित्रण आहे. प्रचंड मोठ्या युद्धनौका, अनेक वल्ही आणि शीडे लावून हाकल्या जात आहेत. वीरगळांवर घनघोर युद्धाचे चित्रण असून त्यात धारातीर्थी पडलेले वीर स्पष्ट दिसतात.

सागरी युध्दात मरण पावलेल्या नाविक योध्यांच्या स्मरणार्थ बोरिवलीजवळ एक्सर येथील वीरगळ

वीरयोध्याबरोबर सतीच्या स्मरणार्थ सतीशिळाही उभारत. यावर सतीचा हात व क्वचित जागी तिची प्रतिमा कोरलेली असते. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली , उस्मानाबाद या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये वीरगळ उभारल्याचे आढळते.

वाटेगाव (ता.वाळवा. जि. सांगली ) येथील सतीशिळा

कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील तुळशी आणि भोगावती नदीच्या संगमावर कसबा बीड हे छोटसं गाव वसलेलं आहे. कसबा बीडमध्ये शेकडो वीरगळ आणि मूर्ती सापडल्या आहेत. यातील काही मूर्ती आणि विरगळीचे महादेव मंदिर परिसरात स्मारक करण्यात आले आहे.

कसबा बीड (ता.करवीर. जि. कोल्हापूर ) मधील वीरगळ स्मारक

अतुल मुळीक 
इतिहास अभ्यासक,
सांगली.

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल

1 comment

Supriya September 14, 2022 - 6:57 pm

अप्रतिम लेख. आज पर्येंत याला काय म्हणतात हे माहित नव्हतंच. पण बराच मंदिरांमध्ये पहिला आहे. आभारी आहोत उत्कृष्ट माहितीबद्दल.

Reply

Leave a Comment

error: कॉपी नका करू. लिंक शेअर करा.
%d bloggers like this: