दख्खनच्या पठारावर वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी गावाजवळ विलासगड आहे. गडावर मल्लिकार्जुन मंदिर असल्यामुळे यास मल्लिकार्जुन म्हणूनही ओळखले जाते. विलासगड हा गिरिदुर्ग समुद्र सपाटी पासून २६८० फूट उंचीवर आहे.
पूर्वी हा किल्ला आदिलशहाकडे असावा. १७१७ – १८ यावर्षी मोगलांनी शाहूंना दिलेल्या सुमे व किल्ल्यांच्या यादीत विलासगडचे नाव आहे. १७९८ ला गड पुनर्बांधणीचा प्रयत्न झाल्याची नोंद आहे. अफजलखान वधानंतर १६७० -७१ च्या दरम्यान हा किल्ला शिवरायांच्या ताब्यात आला असावा. प्रामुख्याने या गडाचा वापर टेहळणीसाठी होत असावा.
सध्या हा डोंगर व गड वनखात्याच्या ताब्यात आहे.
येडेनिपाणी गावाच्या पूर्वेला तीन कि.मी. अंतरावर पायथ्या जवळून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
अगस्ती ऋषींनी या देवस्थानची स्थापना केली असे म्हणतात.
मंदिर खडकात खोदलेले आहे.
उमाशंकर, भीमाशंकर, मानकरी कट्टा, सासुरवाशीण मूर्ती, कोरीव खांब, स्वयंभू सोमनाथ, नागशिल्प, कोरीव दरवाजे, दीप माळेवरील हत्ती, तिरका नंदी या परिसरात आहे. तुळशीवृंदावन, हेमाडपंथी मंडप, गंगा टाके हे पाण्याचे ठिकाण मंदिर व आवाराचे सौंदर्य खुलवतात. हे ‘ क ‘ वर्ग पर्यटन स्थळ आहे.
मंदिराच्या पाठीमागून वर गेले की वरच्या पठारावर दरवाजाचे अवशेष आहेत. झेंडा काठी, वाड्याचे अवशेष, तट बांधकामे अवशेष आहेत. गडावर भुयारी कोठारे तसेच एक तलाव आहे.
गडावर श्रीकृष्ण मंदिर, विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. घोडे तळाची जागा आहे. काझा कबीर चांदसाहेब दर्गा परिसरात मुस्लीम भाविकांची गर्दी असते. अनेक पाण्याचे टाके आहेत. विलासगड हा अनेक पौराणिक कथा व इतिहासाचा संगम आहे. मंदिर परिसरात नगारखाना आहे.
यादवकालीन गुहा
वरच्या बालेकिल्ला पठारावरील दर्ग्याला हजरत चांदबुखारी बाबा दर्गा असे नाव असून या परिसराला स्थानिक पातळीवर बावरदीन म्हणतात. हिंदू मुस्लीम भाविकांची गर्दी असणारा पण पर्यटन स्थळ म्हणून विकासाच्या प्रतीक्षेत असलेला वाळवा तालुक्यातील मल्लिकार्जुन उर्फ विलासगड इतिहासाच्या खुणा अंगा खांद्यावर झेलत उभा आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हा गड हिंदू मुस्लीम भाविकांच्या गर्दीने फुलून येतो.
पठारावरून परिसरातील रमणीय निसर्ग, कृष्णा, वारणा या नद्या, पन्हाळा, किल्ले मच्छिंद्रगड, आगाशिवचा परिसर दिसतो. कातळाच्या पोटातील गुहेत मल्लिकार्जुन मंदिर हे भाविकांसाठी आकर्षण स्थळ आहे. श्रावण महिन्यातील दर सोमवारी जत्रेमूळे डोंगर माणसांच्या गर्दीने फुलून येतो.
प्रा. डॉ. संजय थोरात, इस्लामपूर. ता.वाळवा जि. सांगली.
मोबाईल नंबर – +91 98502 48286