राज्यभिषेकप्रसंगी सार्वभौमत्वाचे प्रतिक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन धातूंमध्ये नाणी पाडली होती. तांब्याची ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘होन’. नाण्यांवर देवनागरी लिपीचा वापर केला होता. नाण्याच्या एका बाजूला ‘श्री राजा शिव’ व दुसऱ्या बाजूला ‘छत्रपती’ अशी अक्षरे होती. सर्वसामान्य लोकांच्या व्यवहारात तांब्याची ‘शिवराई’ हे नाणे चलनात वापरले जाई तर ‘होन’ या नाण्याचा वापर मोठ्या व्यवहारात केला जाई.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेले शिवराई नाणे हे तांब्याचे असून त्याचे वजन ११-१३ ग्रामच्या आसपास असते. या नाण्याचे त्याकाळी मूल्य एक पैसा असावे.
रायगड शिवराई
११ ते १३ ग्रॅम वजन आणि नाण्याच्या कडेनी बिंदुमय वर्तुळ (dotted border) असणाऱ्या शिवराईला संग्राहक रायगड शिवराई म्हणजे रायगडच्या टांकसाळीतुन पाडलेली शिवराई मानतात. या शिवराईवर पुढील बाजुनी तीन ओळीत- ‘श्री/राजा /शिव’ आणि मागील बाजुनी- ‘छत्र/पति’ असे दोन ओळीत लिहीलेले असते. बिंदुमय वर्तुळ असणाऱ्या शिवराई सुबक असुन पुढील व मागील बाजु व्यवस्थित जुळविलेल्या असतात.
शिवकाळात एक पैसा शिवराई, अर्धा पैसा शिवराई, पाव पैसा शिवराई असे नाण्यांचे भाग होते, कदाचीत त्याच्या खाली ही असावे कारण काही कागदपत्रांमधे ‘रुका’ हा शब्द येतो (‘रुका/ रुकअ’ चा अर्थ धातुचा तुकडा असा होतो). हि नाणी अंतर्मुल्यधारीत असल्याने या नाण्यांचे मुल्य हे त्यांच्या वजनावरुन ठरवले जाई. जसे शिवराई 11-13 ग्राम ची मानल्यास अर्धी शिवराई 6-7 ग्राम आणि पाव शिवराई 3-4 ग्राम वजनाची होते. त्याखालच्या वजनाची म्हणजे 1-3 ग्राम वजनाचीही नाणी उपलब्ध आहेत.
अर्धी शिवराई
शिवाजी महाराजांच्या एक पैसा शिवराई प्रमाणेच अर्धी शिवराई वर देखिल बिंदुमय वर्तुळात पुढिल बाजुनी तीन ओळीत- ‘श्री/राजा /शिव’ आणि मागील बाजुनी बिंदुमय वर्तुळात दोन ओळीत ‘छत्र/पति’ असाच मजकुर आढळतो.
चिन्हांकित शिवराईचे प्रकार –
शिवराई नाण्यावर पुढील बाजुला ‘श्री/राजा/सिव’ आणि मागील बाजुनी- ‘छत्र/पति’ असा मजकुर आहे.
पुढील बाजुनी ‘श्री/ राजा/ सीव’ आणि मागील बाजुनी ‘छत्र/ पति’
‘चंद्रकोर’ चिन्ह अंकीत असलेली शिवराई.
श्री आशुतोष पाटील.
ऐतिहासिक नाणी संग्राहक, अभ्यासक, संशोधक व लेखक
औरंगाबाद. मोबाईल नंबर- 8669019748