Home तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र काशीच्या विकासात सांगलीचेही योगदान

तीर्थक्षेत्र काशीच्या विकासात सांगलीचेही योगदान

पटवर्धन घराण्यातील सरदारांचा पुढाकार

by sinhasan

मंदिरांना दिल्या देणग्या ; बांधले वाडे आणि घाटांच्या जीर्णोद्धारासाठी केली मदत…

जगात प्रत्येक धर्मानुसार विशिष्ट स्थाने पवित्र मानली जातात. या पवित्र स्थानांनाच तीर्थक्षेत्रे अस म्हटलं जात. हिंदू धर्मात आणि संस्कृतीत तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. काशी हे हिंदूंना सर्वांत पूज्य वाटणारे तीर्थक्षेत्र आहे.

तीर्थक्षेत्र काशीच्या विकासात तत्कालीन अनेक लहानमोठे राजेरजवाडे, दानशूर व्यक्ती यांनी योगदान दिले आहे. गेल्या अडीचशे वर्षांत सांगली जिल्हय़ातील भक्तांनीही काशीच्या विकासात खारीचा वाटा उचलला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी काशीमध्ये अनेक मंदिरांचे जीर्णोध्दार केले. घाट बांधले. अन्नछत्रे उघडली. त्यांच्याबरोबरच पेशव्यांनी आणि त्यांच्या सरदारांनीही काशीतील मंदिरांसाठी देणग्या दिल्याचे आढळते. सांगली जिल्हय़ातील पटवर्धन घराण्यातील सरदारांनीही काशीच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.

त्यासंबंधीची कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात उपलब्ध आहेत.

 

विशेषतः पटवर्धन घराण्यातील व्यक्तींनी काशीतील मंदिरे, घाट यांच्यासाठी देणग्या दिल्या. तेथे यात्रेकरूंसाठी धर्मशाळा आणि अन्नछत्रे उघडली. तेथील विद्वांनाना जमिनी इनाम दिल्या आहेत. पटवर्धन सरदारांच्या घराण्यातील व्यक्तींनी केलेल्या काशीयात्रा त्याकाळात गाजल्या होत्या.

पटवर्धन सरदार आणि काशी तीर्थक्षेत्र

पटवर्धन घराणे हे उत्तर मराठेशाहीतील पराक्रमी घराणे होते. या घराण्यातील व्यक्ती धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. या घराण्यातील अनेक व्यक्तींनी वेळोवेळी काशीयात्रा केल्याच्या नोंदी आहेत. या काशीयात्रांमध्ये त्यांनी तेथील मंदिरांना देणग्या दिल्या. अन्नछत्रे सुरू केली. तेथील विद्वानांना इनामे दिली. घाटांच्या जीर्णोध्दारासाठी मदत केली. काशीक्षेत्री वाडा, धर्मशाळा बांधली. सांगली-मिरजेतील पटवर्धन घराण्यांपैकी त्रिंबक हरी पटवर्धन, सरस्वतीबाई पटवर्धन, मोरो बल्लाळ पटवर्धन यांच्या मातोश्री, गंगाबाईसाहेब पटवर्धन यांनी केलेल्या काशीयात्रा प्रसिध्द आहेत.

सरस्वतीबाईंची गाजलेली काशीयात्रा

पटवर्धन घराण्यातील प्रसिध्द सरदार गोपाळराव पटवर्धन यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनी केलेली काशीयात्रा ही मराठेशाहीतील गाजलेली यात्रा होती. सन 1783 च्या ऑक्टोंबर महिन्यात त्यांची यात्रा सुरू झाली. या यात्रेत सध्याच्या सांगली जिल्हय़ाच्या बहुतांशी भागातून शेकडो लोक सहभागी झाले होते. गोपाळरावांसारख्या एका मोठ्या सरदाराच्या पत्नीची ही काशीयात्रा असल्याने त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, उंट, पालखी, डोल्या असा मोठा सरंजाम होता. वाटेतील निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देत ही यात्रा महेश्वर पोहचली. तेथे अहिल्याबाई होळकरांनी सरस्वतीबाईंचे आणि यात्रेचे स्वागत केले. पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी आपले शंभर राऊत सरस्वतीबाईसोबत दिले. आपल्या राज्याच्या हद्दीत या यात्रेचा चोख बंदोबस्त ठेवला. वाटेत विविध मार्गावर अगोदरच यात्रेसंबंधी पत्रे गेल्याने तेथील कमाविसदारांनी सरस्वतीबाईंचे स्वागत करून त्यांची सोय केली. प्रयाग, काशी आणि गया या तीन तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत सरस्वतीबाईंनी तेथे खूप मोठा दानधर्म केला. तेथील मंदिरांसाठी देणग्या दिल्या. विद्वानांना सोन्याची कडी, दक्षिणा दिल्या. काशीमध्ये सरस्वतीबाई आल्यानंतर त्यांच्याबरोबर चाळीस हजार यात्रेकरू जमले होते.

मोरो बल्लाळांच्या मातोश्रींची यात्रा

सरस्वतीबाई पटवर्धन यांच्याबरोबरच मिरजेच्या मोरो बल्लाळ पटवर्धन यांच्या मातोश्रींनीही सन 1785 मध्ये काशीयात्रा केली होती. त्यासाठीही मिरज आणि सांगली परिसरातून शेकडो यात्रेकरू जमले होते. या यात्रेसाठी सवाई माधवराव पेशव्यांनी अहिल्याबाई होळकर आणि महादजी शिंदे यांना पत्रे लिहून मिरजेतील यात्रेकरूंची सोय करण्याच्या सूचना केल्या होत्या. सवाई माधवरावांनी अहिल्याबाई आणि महादजी शिंदे यांना लिहीलेली ही दोन्ही अस्सल पत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत. ही यात्राही सुमारे सहा महिने चालली. मोरो बल्लाळ यांच्या मातोश्रींनी काशीमध्ये खूप दानधर्म केला. मंदिरांना देणग्या दिल्या.

काशीमध्ये सांगलीकरांचा वाडा आणि अन्नछत्र

श्री क्षेत्र काशीमध्ये थोरल्या चिंतामणराव पटवर्धनांनी मोठा वाडा आणि अन्नछत्र उभारले होते. सांगलीकरांचा वाडा या नावाने हा वाडा काही वर्षांपूर्वीपर्यंत काशीमध्ये प्रसिध्द होता. श्री क्षेत्र काशीमध्ये सांगली भागातून दरवर्षी अनेक यात्रेकरू जात. यामध्ये पटवर्धनांची आप्तमंडळी, अधिकारी यांचा समावेश असे. त्यामुळे त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी, म्हणून सांगलीकरांनी तेथे मोठा वाडा बांधला. तसेच काशीमध्ये येणाऱ्या यात्रेकरूसाठी अन्नछत्र उभारले. चिंतामणरावांनी काशीमधील अनेक पंडितांना सांगलीत बोलावून त्यांना मोठय़ा देणग्या दिल्या. तेथील घाट आणि मंदिरांच्या जीर्णोध्दारासाठीही मदत केल्याचे दिसते. काशी क्षेत्राच्या विकासासाठी सांगली-मिरजेतील पटवर्धन सरदारांनीही खारीचा वाटा उचलला आहे. त्याच्या गेल्या अडीचशे वर्षांतल्या नोंदी उपलब्ध आहेत.

मानसिंगराव कुमठेकर,

इतिहास अभ्यासक व संशोधक,
मिरज.
9405066065

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल

Leave a Comment

error: कॉपी नका करू. लिंक शेअर करा.