Home गड-किल्ले- स्फूर्तीस्थान राजापुरीच्या उरावर उभारली दुसरी राजापुरी

राजापुरीच्या उरावर उभारली दुसरी राजापुरी

सिद्दीच्या बंदोबस्तासाठी शिवरायांनी बांधला पद्मदुर्ग

by sinhasan

इतिहास पद्मदुर्गाचा…

कोकणात ज्या परकीय सत्तांनी आपलं बस्तान बसवलं होतं त्यामध्ये जंजिरेकर सिद्दी हे जास्त जुलमी व उपद्रवी होते. आफ्रिकेतील अबेसेनियातून आलेल्या या हबशी सिद्द्यांनी थोड्याच अवधीत कोकणात आपला जम बसवला होता. अनुभवी आरमार आणि अजिंक्य जंजिऱ्यामुळे ते उन्मत्त झाले होते. माजले होते. कोकण किनारपट्टीवर दिवसाढवळ्या लुटमार, जाळपोळ, निरपराधांची खुलेआम कत्तल केली जात होती. बायाबापड्यांची लाखमोलाची अब्रू लुटली जात होती, रयतेची गुलाम म्हणून विक्री केली जात होती. जनतेवर होणाऱ्या या छळांची माहिती शिवरायांपर्यंत पोहचली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी जिंकून कोकणात प्रवेश केला होताच, पुढील काही काळात स्वराज्याची सीमा तळकोकणापर्यंत वाढविली. अशावेळी या सिद्द्यांनी मांडलेल्या उच्छादांची दखल घेणे भागच होते. सातत्याने तो मराठी मुलखास त्रास देत होता. या सिद्द्याला शिवाजी महाराजांनी बरोबर ओळखला होता “जैसा घरास उंदीर तैसा राज्यास सिद्दी”. या सातत्याने उपद्रव देणाऱ्या उंदराला त्याच्या बिळातच ठेचून मारण्याचा निश्चयच राजांनी केला. त्यासाठी त्यांनी ‘जंजिरा’ जिंकण्याच्या अनेक मोहिमा आखल्या पण दुर्दैवाने तो जिंकता आला नाही. याचे प्रमुख कारण असे होते की, चारी बाजूने समुद्राने वेढलेल्या जंजिऱ्याची जमिनीवरून नाकेबंदी केली तरी समुद्राची बाजू मोकळी राहिल्याने त्याला रसद मिळत होती. त्यामुळे तो दीर्घकाळ लढा देऊ शकत होता. जिद्दी आणि उपद्रवी सिद्द्यांचे आरमार प्रबळ होते, बुलंद जंजिऱ्याचा आश्रय होता, समुद्र त्यास मोकळा होता म्हणून या सिद्द्याला जरब बसावी म्हणून जंजिऱ्यापासून जवळच चारी बाजूने समुद्राने वेढलेल्या ‘कांसा बेटावर’ शिवाजी महाराजांनी ‘पद्मदुर्ग’ बांधण्याचे योजले.

 “एका आघाडीवर यश मिळत नसतानाही दुसरी आघाडी उघडून नाक दाबल्यावर तोंड उघडते”, या तत्वाने शत्रूला जेरीस आणणे… राजांच्या या सर्व गुणांचा पुनःप्रत्यय येत रहातो. जंजिऱ्याला शह देण्यासाठी, सिद्दीला दहशत बसावी या हेतूने पद्मदुर्गाची निर्मिती करण्यात आली होती. महाराजांच्याच शब्दात सांगायचे झाले तर “पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजपुरी उभारली.”

 

सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्राच्या सागर किनाऱ्यावर फिरंगी पोर्तुगीज, जंजिरेकर सिद्दी, टोपीकर इंग्रज, वलंदेज डच आदी परकीय सत्तांनी आपलं बस्तान बसवलं होतं. हातात तलवार आणि तराजू घेऊन या सत्तांनी अगदी मोक्याच्या जागा ताब्यात ठेवल्या होत्या. पण “आरमार हे राज्याचे स्वतंत्र राज्यांगच’ असे मानणाऱ्या शिवरायांनी स्वराज्यनिर्मिती, स्वराज्यवर्धन आणि स्वराज्यरक्षण यासाठी आरमाराची निर्मिती केली होती.

या आरमाराच्या संरक्षणार्थ जलदुर्गांची आणि किनारी किल्ल्यांची एक साखळीच उभी केली. रायगड जिल्ह्यातील मुरुड जवळच्या कांसा बेटावरील शिवरायांनी निर्मिलेला, स्वराज्याच्या सेवेशी तत्पर असलेला, स्वत:चे वेगळेपण टिकवून जंजिऱ्याच्या नाकावर टिच्चून उभा असणारा ‘पद्मदुर्ग’ हा या साखळीतील एक मजबूत कडी.

पद्मदुर्ग: जलदुर्गस्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना

१६७३-७४ च्या आसपास शिवरायांनी कांसा बेटावर पद्मदुर्गाचे बांधकाम सुरू केले. पण येथे दुर्ग बांधणे म्हणजे मोठ्या जिकीरीचे काम होते. सिद्दी आपल्या डोळ्यादेखत बांधल्या जाणाऱ्या या जलदुर्गाचे काम स्वस्थ बसून पाहणाऱ्यातला नव्हता. तरीही सर्व जोखीम ओळखून या जलदुर्गाच्या बांधकामाच्या आज्ञा शिवरायांनी आपल्या दुर्गस्थापत्यकारांना दिल्या. कांसा बेटावर पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार, कारागीर, मजूर एकदिलाने कामाला भिडले. किल्ल्याच्या कामात अडथळा येऊ नये आणि काम अबाधित सुरू ठेवण्यासाठी मावळ्यांची शिबंदी तैनात करण्यात आली. आरमाराची गस्त वाढली आणि नियोजनबद्ध बांधकामास सुरुवात झाली.

पद्मदुर्ग बांधताना शिवरायांनी वेगळीच पद्धत वापरली, त्याकाळी उपलब्ध असलेल्या अत्यंत उत्कृष्ट दर्जाच्या चुन्याचे मिश्रण तटाच्या दगडांमधील फटी भरण्यासाठी वापरले. या चुन्यात डिंक, शंख-शिंपल्यांचा चुरा, मध व काथ्याचा कूट असे पदार्थ मिसळून चुन्याच्या घाणीत हे मिश्रण एकजीव करून ते वापरले होते.

आजही आपण पद्मदुर्गावर गेलो तर प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूच्या तटबंदीतील खडकांवर आपली नजर खिळते. जवळपास ३५० वर्षेहुन अधिक समुद्राच्या लाटांच्या आघाताने या खडकांची तब्बल ८- १० सेमी पर्यंत झीज झालेली दिसते. अभेद्य असे तटबंदीतील खडक झिजले पण त्या खडकांमध्ये भरलेले चुन्याचे मिश्रण जसेच्या तसे! दगडांपेक्षा भक्कम चुनानिर्मितीचे तंत्र शिवदुर्गस्थापतींनी आत्मसात केल्याचा हा पुरावाच मानावा लागेल.

मुख्य किल्ला:
पद्मदुर्ग हा किल्ला २ भागामध्ये बांधलेला आहे एक मुख्य किल्ला आणि दुसरा पडकोट. ज्यावेळी आपण समुद्रामधून बोटीने जातो त्यावेळी आपण मुख्य किल्ल्याच्या प्रवेश दाराजवळ जातो तेथे एक बुरुज अजूनही शाबूत आहे तसेच या किल्ल्याची तटबंदी देखील बऱ्यापैकी शाबूत आहे.

पडकोट :
आपल्यला येथे पडकोट आपल्यला मुख्य किल्ल्याच्या समोर पाहायला मिळतो म्हणजे पडकोट किल्ल्याचे काही अवशेष पाहायला मिळतात. येथे आपल्यला विहीर, तोफा आणि इमारतीचे काही अवशेष पाहायला मिळतात.

बुरुज:
बुरुज हा आपल्यला प्रत्येक किल्ल्यावर पाहायला मिळतो. कारण तो शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जातो. या किल्ल्यावर देखील आपल्यला बुरुज पाहायला मिळतात आणि या बुरुजांच्या वरती कमळाच्या फुलांच्या पाकळ्यांचे नक्षी बनवली आहेत त्यामुळे हे बुरुज कमळाच्या  फुलासारखे दिसतात. पद्मदुर्गावरील या बुरुजाला पाकळी बुरुज असेही संबोधले जाते.

संदीप स. मुळीक. 
दुर्ग अभ्यासक, मुंबई.

मोबाईल नंबर – 9820972091
muliksandeeps@gmail.com

 

 

Leave a Comment

error: कॉपी नका करू. लिंक शेअर करा.